महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झ्युरिक: “महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’साठी मजबूत पार्श्वभूमी आणि सक्षम इकोसिस्टिम तयार केली असून, याच आधारावर यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. अन्य राज्यांशी आमची सकारात्मक स्पर्धा आहे. ही स्पर्धा अखेरीस देशाच्या हिताचीच ठरते. मात्र या स्पर्धेतही महाराष्ट्र आघाडीवर आहे, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह राज्याचे उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ दावोस येथे दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रांसाठी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी दहा ते बारा विविध क्षेत्रांतील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. “आता तिसरी मुंबई उभी राहत असून, त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे संकेत मिळत आहेत. आमच्याकडे उत्तम ‘मेन्यू कार्ड’ आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आम्ही यशस्वी ठरू,” असे त्यांनी सांगितले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारची ‘चावडी’ आहे. दरवर्षी येथे महाराष्ट्राकडे काय क्षमता आहे, कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याचे सादरीकरण केले जाते. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात आजपर्यंत सुमारे 60 ते 65 सामंजस्य करार प्रत्यक्षात उतरवण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे. “दावोस हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहेच, पण येथे उद्योगजगत एकत्र येते. महाराष्ट्रातील उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात महाराष्ट्राने सरासरी 10 टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला आहे. “राज्य 2032 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनू शकते, मात्र हा टप्पा 2030 पर्यंत गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले. जागतिक भू-राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असली तरी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘ब्राइट स्पॉट’ आहे. जगात विकासदर मंदावले असताना महाराष्ट्र मात्र आपला विकासदर टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39 टक्के एफडीआय महाराष्ट्रात आला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत 15 ते 16 गुंतवणूक धोरणे लागू केली असून, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह इकोसिस्टिम तयार झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) हे अर्थव्यवस्थेचा कणा असून रोजगारनिर्मितीत त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. केंद्र व राज्य सरकार एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 16 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. यापैकी प्रत्यक्ष गुंतवणूक होण्यासाठी स्वतंत्र ट्रॅकिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. देशात सरासरी 25 ते 30 टक्के करार प्रत्यक्षात येतात, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 50 ते 55 टक्के असून दावोस करारांमध्ये 75 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो. देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात असून राज्य आता ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनले आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी उभारली जात असून, यामुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाढवण बंदर जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असून जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असेल. हे बंदर जगातील सर्वात मोठ्या जहाजांना सामावून घेण्यास सक्षम असेल. पुढील तीन वर्षांत पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेसाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात आहे. “महाराष्ट्रात गुंतवणूक सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात