नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्र शासनाने तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी देऊनही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आजही फक्त कागदावरच आहे. एकही वीट न रचली जाणे, कोणतेही बांधकाम न सुरू होणे, हा प्रकार महाराष्ट्राच्या अस्मितेवर पाणी फेरणारा ठरत असून कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांच्याबद्दल संतापाचा सूर चढू लागला आहे.
डॉ. पंडित या पुणेकर असूनही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या प्रकल्पाकडे त्यांनी पाठ फिरवली, अशी भावना राज्यभर उमटू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग-भाषा मंत्री उदय सामंत यांनी आश्वासने देऊनही प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम ‘शून्य’ आहे.
जेएनयूला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि महाराष्ट्रातून भेट देणाऱ्या अभ्यागतांचे म्हणणे आहे की, “फक्त नामफलक दिसतो, बाकी जागा पोकळ आहे.” महाराष्ट्राने दिलेले कोटींचे पैसे कोठे गेले, याचा हिशोब कुणीही देत नाही.
या केंद्रामुळे मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाला जागतिक प्रतिष्ठा लाभेल आणि केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष काम न झाल्याने हा निधीही धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांचा सूर स्पष्ट आहे –
“कुलगुरू महाराष्ट्रातून असूनही जर अस्मितेच्या प्रकल्पाला प्राधान्य मिळत नसेल, तर त्यांना जबाबदार धरल्याशिवाय पर्याय नाही. ९ कोटींचा निधी गेला कुठे? महाराष्ट्राशी असा विश्वासघात खपवून घेतला जाणार नाही.”