महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर व शेतकरीविरोधी भूमिकेमुळे महाविकास आघाडीचा चहापान कार्यक्रमावर बहिष्कार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस बिघडत चाललेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांविषयी सरकारची असंवेदनशील भूमिका, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था आणि विविध भ्रष्टाचार प्रकरणांत मंत्र्यांचा सहभाग यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज अंबादास दानवे यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळातील घोटाळे, राज्यात वाढलेले अत्याचार, तसेच जनतेची व शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक यावर कठोर टीका केली.

या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे उपनेते अमीन पटेल, आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, “सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. पोलिस यंत्रणा त्यांचे संरक्षण करत आहे, तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देत आहेत. भाजप आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, हेच कळेनासं झालं आहे.”

”महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला हजर राहणं म्हणजे पाप”

शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्या चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप करत असलेल्या लोकांनाच शेजारी बसवणार असतील, तिथं जाणं म्हणजे भ्रष्टाचाराच्या समर्थनासारखं आहे. मुख्यमंत्री म्हणतील, ‘ह्याच लोकांवर मी आरोप केले होते.’ अशा कार्यक्रमात जायचं म्हणजे पापच.”

ते पुढे म्हणाले, “समृद्धी महामार्गाला माझ्या आजोबांचं (बाळासाहेब ठाकरे) नाव दिलं, पण त्या महामार्गावर खड्डे पडले आहेत, नदी वाहते आहे. हे नक्की काय चाललंय?”

”कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत” – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं हे सरकार आहे. कोणतंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. निधी हवा असेल तर टक्केवारी मोजावी लागते. कांदा, कापूस, सोयाबीन यांना भाव नाही. कापसाला कीड असतानाही शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. जनतेला वाऱ्यावर सोडलं गेलं आहे. त्यामुळे आम्ही या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत.”

”महायुती सरकारचा राजकीय जुगार केविलवाणा” – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “महायुती सरकार राजकीयदृष्ट्या उध्वस्त झालं आहे. सध्या सरकार जो राजकीय जुगार खेळत आहे, तो केविलवाणा आणि किळसवाणा आहे.”

”शक्तीपीठ महामार्ग शेतकरीविरोधी” – सतेज पाटील

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, “शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतील शेतकरी विरोध करत आहेत, तरीही सरकार हा प्रकल्प पुढे रेटते आहे. याला राजकीय रंग दिला जातो आहे. हा महामार्ग गरजेचा नाही. त्यामुळे तो रद्द करावा, अन्यथा राज्याच्या आर्थिक स्थितीवर त्याचा विपरित परिणाम होईल.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात