मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया उद्या (२४ जानेवारी) पासून सुरू होणार आहे. हमीभावाने ३ लाख मेट्रिक टन तूर खरेदी केली जाणार असून यासाठी ३०० खरेदी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज तूर खरेदी प्रक्रियेच्या आढावा बैठकीत रावल बोलत होते. बैठकीस मार्फेड आणि नाफेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि तातडीने पेमेंट
मंत्री रावल यांनी नोंदणी आणि खरेदी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश दिले. खरेदी केल्यानंतर ७२ तासांत शेतकऱ्यांना पैसे मिळतील, यासाठी जलदगतीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सुविधांचे निर्देश:
1. खरेदी केंद्रांवर पाण्याची, बसण्याची आणि तक्रार निवारणाची व्यवस्था.
2. वेअरहाऊस व्यवस्थापनाची तयारी आणि डेटा एन्ट्रीसाठी आवश्यक मनुष्यबळ.
3. तांत्रिक अडचणींवर नियंत्रण ठेवून नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
तूर खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी विनाअडथळा आणि सुव्यवस्थित पार पडेल, यासाठी प्रशासनाने पूर्ण दक्षता घ्यावी, असे रावल यांनी स्पष्ट केले.