गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण आदरांजली
मुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक कै. विजय वैद्य यांच्या पुढाकाराने २८ वर्षांपूर्वी बोरीवली पूर्व येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर सुरू झालेल्या मालवणी महोत्सवाची यंदाही उत्साहात सुरुवात झाली. अवेळी झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला असला तरी कार्यकर्त्यांनी शर्थीने काम करत ही अडचण पार करत महोत्सवास दणदणीत सुरुवात करून दाखवली.
कै. विजय वैद्य यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रंगमंचावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि मार्मिक चे ज्येष्ठ स्तंभलेखक योगेंद्र ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन केले.
मराठी व मालवणी नाट्यसृष्टीत अमीट ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांना या प्रसंगी आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला उत्सव प्रमुख व मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव वसंत सावंत, माजी शाखाप्रमुख अशोक परब, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, सुहास पाटकर, रोहिणी चौगुले, स्मिता डेरे, मंगेश डेरे, नंदकिशोर शिवलकर, मनोज सनान्से, अमित सावंत यांसह मान्यवर उपस्थित होते.
’संभ्रम नाही — शुद्ध भगवा’चा निर्धार
सत्ताधारी महायुतीकडून पसरविण्यात येणारा संभ्रम दूर करुन, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ज्वलंत हिंदुत्वाची मशाल धगधगत ठेवण्याचा आणि खऱ्या शिवसेनेचा निखळ भगवा सर्वत्र फडकविण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या संकल्पाच्या प्रतीकात्मक स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील श्री देव वेताळ मंदिरात गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर देव वेताळाच्या पालखीला योगेश त्रिवेदी, योगेंद्र ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी खांदा देत भक्तिभावाने परिसरात मिरवणूक काढली.
मालवणी संस्कृती, शिवप्रेम आणि संघटनशक्तीचे दर्शन घडविणारा हा महोत्सव पुढील काही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजणार आहे.

