पुणे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. रविवारी सकाळी १० वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा बराबाभळी येथे पोहोचले. आज बाराबाभळी ते रांजनगांव असा प्रवास करणार आहे. आज सकाळी ९ वाजता ते बाराबाभळीहून निळाले असून सुपा येथे दुपारचं भोजन करतील त्यानंतर रात्रीचा मुक्काम रांजणगाव येथे असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, यासाठी आपली जीव गेला तरी चालेल; असा प्रण जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या तर नगर जिल्ह्यात सव्वादोन लोख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठे कोणाला घाबरत नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. आपल्या मतांच्या जिवावर यांनी राजकारण केले. आता आरक्षण दिले नाही, तर यांना सळो की पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तुमच्यात एकी नाही असे ते म्हणत होते. मात्र आता मराठा समाज एकवटला असून तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही.