महाराष्ट्र ताज्या बातम्या

Marathwada: मतदारांनी ठरवले… मराठवाडा कोणाचा? पाच महानगरपालिकांचे निकाल आज स्पष्ट होणार

नांदेड: मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानानंतर आज शुक्रवारी मतमोजणी होत असून, सायंकाळपर्यंत मतदारांनी कोणाला पसंती दिली याचे चित्र स्पष्ट होणार आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले असले तरी निकालाकडे संपूर्ण मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागले आहे.

यंदा ज्येष्ठ नागरिकांसह नवख्या तरुण मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. मात्र एकूणच मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली. राजकीय विश्लेषकांच्या मते, मराठवाड्यातील प्रगतीचा आलेख लक्षात घेता भाजपला यंदा मोठा फायदा होण्याची शक्यता असून सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुठे रंगली खरी लढत?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दिवशी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर नांदेड व लातूर महानगरपालिकेच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे. जालन्यात पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक झाल्याने तेथील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

२९ महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी एकाच दिवशी मतदान पार पडले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी निवडणूक झाल्याने सर्वच पक्षांची प्रचारासाठी तारांबळ उडाली होती. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, वंचित आघाडी, एमआयएम यांच्यासह सर्वच पक्षांनी जाहीरनाम्यांमधून आश्वासनांचा पाऊस पाडला.

मात्र, “आश्वासने देणारे पक्ष आजपर्यंत ती पूर्ण करताना दिसले नाहीत,” अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांनी उघडपणे व्यक्त केली. तरीही केंद्र व राज्यातील सत्ता भाजपकडे असल्याने विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास काही मतदारांनी व्यक्त केला.

जुने प्रश्न, नवी आश्वासने

पाणी, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे हे मुद्दे गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत. याच प्रश्नांभोवती सर्वच पक्ष फिरताना दिसले. बेरोजगारी, उद्योग, शिक्षण, महिलांचे प्रश्न यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात ठोस उपाययोजना दिसून आल्या नाहीत.

मतदानाच्या दिवशी अनेक मतदार एकमेकांना प्रश्न विचारत होते –
“जे आज सत्तेत आहेत ते काल विरोधात होते आणि जे विरोधात आहेत ते कधी ना कधी सत्तेत होते, तरीही हे प्रश्न आजवर सुटले का नाहीत?”

भाजपच्या आशा पल्लवीत

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी आणि जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष देत प्रचार केला. जाहीर सभांमधून विकासकामांची दिशा व भविष्यातील भाजपची भूमिका स्पष्ट केल्याने पक्षाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

निकालाची उत्सुकता

आज सायंकाळपर्यंत मराठवाडा कोणाचा हे स्पष्ट होणार असले तरी, भाजपची मुसंडी कायम राहील आणि मराठवाड्यात भाजप सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारा पक्ष ठरेल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील जनतेने कोणाच्या हाती सत्ता दिली, याचे उत्तर काही तासांत मिळणार आहे.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandage) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात