मुंबई – “घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करत आहे,” असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
ते ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत आयोजित ५,३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीचे उद्घाटन करताना बोलत होते.
म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरं आणि भूखंडांच्या सोडतीसाठी तब्बल १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले. “म्हाडाच्या घरांच्या गुणवत्तेवर आणि किमतीवर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास यावरून स्पष्ट दिसतो,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सोडत पूर्णपणे संगणकाद्वारे पार पाडली गेली असून, कोणताही मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी सुरुवातीपासून दक्षता घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
“पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती, मात्र आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची, वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचे कारण ठरली आहे,” असे शिंदे म्हणाले.
त्यांनी सांगितले की आतापर्यंत ९ लाख घरे म्हाडामार्फत वितरित झाली असून आणखी ६० हजार आणि ४३ हजार घरांची भर पडणार आहे.
ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, डोंबिवली आणि उल्हासनगर भागात मोठ्या प्रमाणावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. “राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत ३० ते ३५ लाख नवीन घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या माध्यमातून खासगी आणि सरकारी क्षेत्रात मिळून सुमारे ५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की, “बाळासाहेब ठाकरे यांचे ‘प्रत्येकाला घर’ हे स्वप्न आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत.”
परवडणारी घरे, नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार केले असून, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी भाड्याची घरे या योजनेत समाविष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरे बांधली जात असून, सिडको, एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या संयुक्त माध्यमातून रखडलेले म्हाडा आणि एसआरए प्रकल्प पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
रमाबाई आंबेडकर नगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम सुरू असून तेथील रहिवाशांना १६० कोटी रुपये भाडे वितरित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या किमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शासन लवकरच निर्णय घेईल,” असे शिंदे म्हणाले. “नव्या जीएसटी धोरणामुळे घरांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची खरेदीक्षमता वाढली आहे. खरेदी वाढली की उत्पादन आणि रोजगार निर्मितीही वाढते,” असा दावा त्यांनी केला.
“क्लस्टर प्रकल्पांतर्गत मोठे रस्ते, बागा, वैद्यकीय सुविधा, क्रीडांगणे आणि जिम अशा आधुनिक सोयी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही योजना केवळ देशातच नव्हे, तर जगातही आदर्श ठरेल,” असे शिंदे म्हणाले.
म्हाडाने निर्माण केलेला विश्वास आणि गुणवत्ता कायम राखण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कार्यक्रमादरम्यान सभागृहात सोडतीचा निकाल पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते तसेच अर्जदारांना घरबसल्या निकाल पाहता यावा म्हणून वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या सोडतीच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजिव जयस्वाल, मुख्याधिकारी रेवती गायकर आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.