Twitter : @NalavadeAnant
मुंबई
माझ्या कालच्या (रविवार) भाषणात मी कुठेही शरद पवार यांच्याबाबत टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही, असा खुलासा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी ट्वीट करत केला आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ट्विटर हॅंडल वरुण स्पष्ट करण्यात आले आहे की दिलीप वळसे पाटील त्यांच्या व्यक्ताव्यावर ठाम आहे, जो गैरसमज झाला केवळ त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे.
शरद पवार यांच्यासारखा एवढा मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते. ते घडले नाही त्याबद्दलची खंत दिलीप वळसे पाटील यांनी बोलून दाखवली. ही खंत केवळ कालच (रविवार) बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये आपण जाहीरपणे बोललो आहे, असेही वळसे – पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवारांवर कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे कदापि शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे, त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो, असे वळसे पाटील म्हणाले.
जे राजकीय विश्लेषण कालच्या (रविवार) भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, त्याचा प्रसार माध्यमांनी अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचेही वळसे पाटील यांनी नमूद केले.