Twitter : @therajkaran
मुंबई :
ठाकरे बंधू आमच्या भूमिकेसोबत असून गणेशोत्सवानंतर राज ठाकरे स्वतः बारसूला येणार असल्याची माहिती बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी दिली आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारसू रिफायनरीचा विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामधील अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.
कोकणातील मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा मतदार असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा देखील हाच मतदार आहे. संघटना सुरुवातीपासूनच तिथे रिफायनरी नको अशी मागणी करत होते. तीच भूमिका राज ठाकरे यांनी देखील मांडली. येथील जागतिक वारसा लाभलेल्या कातळ शिल्पांचे संवर्धन झालेच पाहिजे, रिफायनरीच्या विरोधात स्थानिक जनतेसोबत दोन्ही ठाकरे बंधू असल्याचे या संघटनांनी सांगितले.
मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घेतले जात असतील तर कोकणवासीयांवर दाखल झालले गुन्हे कधी मागे घेणार? असा सवाल या संघटनांनी विचारला आहे. कोकणात होणाऱ्या बारसू प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यासाठी विविध स्तरावर आंदोलनं देखील करण्यात आली. या आंदोलकांवर त्यानंतर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे बारसू विरोधी संघटना आणखी आक्रमक झाल्या.
मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व आंदोलकांचे निर्णय मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी विरोधी संघटना आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी होत आहे. तुर्तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज यांच्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पावर चर्चा झाली असली तरी विरोध राहणार असून त्यांच्या ठरावाला आम्ही फार गांभीर्याने घेत नाही. त्यांनी समिती जरी गठित केली तरी आम्ही बारसूला विरोध करत राहूच, आम्ही रिफायनरी होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.