महाड: “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आजमावू नका! ती ताकद त्या गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंकडूनच कळेल,” अशा तीव्र शब्दांत महाड शहर मनसेचे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांना प्रत्युत्तर दिले आहे.
गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “मनसेची ताकद कोकणात नाही” असे वक्तव्य केले होते. यावर उमासरे यांनी महाड ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निकालांचा दाखला देत पलटवार केला.
उमासरे म्हणाले, “मंत्री महोदयांच्या गावातील खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत कोणामुळे सरपंच जिंकला आणि किती मतांनी तुमचा उमेदवार पडला, हे विचारले पाहिजे. महाड नगरपरिषदेत तुमचा चिंपाट दलाल कार्यकर्ता किती मतांनी हरला, हे त्याच्याकडे विचारा. नगराध्यक्षपद कोणामुळे गेले हेही त्याला विचारा, म्हणजेच तुम्हाला मनसेची ताकद कळेल!”
महाड मनसे शहराध्यक्ष पुढे म्हणाले, “जर कुणाला मनसेची ताकद आजमावायची असेल तर येणाऱ्या महाड नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका हेच आमचे मैदान आहे. कोकणातला मराठी माणूस मुंबईत ठाकरे कुटुंबामुळेच मान उंच करून जगतो. त्याने जर ठरवलं की कोकणात येऊन गद्दारांचा नायनाट करायचा, तर येणारा काळच ठरवेल की मनसे किती ताकदवान आहे.”
उमासरे म्हणाले, “तुम्ही कशी गद्दारी करून सत्ता स्थापन केली, हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक आहे. आता तोच जनतेचा न्याय ठरवेल की खरा मराठी अभिमान कुणात आहे!”