मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांच्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आज त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले, आणि लवकरच ताठ मानेने तुमच्यासमोर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अमेय खोपकरांचं ट्विट
हिंदुजा रुग्णालयाचे निष्णात सर्जन, रुग्णालय कर्मचारी, माझे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि राजसाहेब ठाकरे या सर्वांचं पाठबळ लाभल्यामुळेच नवीन वर्षात मी नव्या उमेदीने सज्ज झालोय. माझ्या सर्व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच हेही सांगतो की माझ्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता लवकरच ताठ मानेने मी तुमच्यासमोर येणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि सर्वांना नववर्षाभिनंदन.
अमेय खोपकर मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असतात. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलनं पुकारली आहेत. अमेय खोपकर हे राज ठाकरेंच्या खंदे नेत्यांपैकी एक आहेत. आगामी लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीमागे काय समीकरण असून शकतं याची माहिती येत्या दिवसात जनतेपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.