मुंबई
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ‘नाटक आणि मी’ या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरुन कलावंतांचे कान पिळले.
सध्या मराठी अभिनय क्षेत्रात एकमेकांना छोट्या छोट्या नावांनी हाक मारण्याची सवल लागलीये. अगदी टेलिव्हिजन कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी कलाकारांना अंड्या..पद्या, मॅक अशा नावांनी हाक मारली जाते. जी अत्यंत चुकीची आहे. तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही, तर लोक तुम्हाला मान का देतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी कलाकारांची शाळा घेतली.
यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्या चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचं उदाहरण दिलं. चार भिंतींत ते एकमेकांचा एकेरी उल्लेख करीत असतील, मात्र सार्वजनिक ठिकाणी असल्यावर ते एकमेकांना सर म्हणूनच हाक मारतात. एकमेकांचा मान ठेवतात. मराठी चित्रपटा कलावंत आहे, मात्र इतर भाषांमध्ये स्टार्स आहेत. मराठीतही एकेकाळी स्टार्स होते. मात्र आपणच ते सांभाळू शकलो नाही. कलावंतानी आपलं मोठेपण जपलं पाहिजे, असं म्हणताना त्यांनी श्रीराम लागू यांचं उदाहरण दिलं.
अनेक कार्यक्रमांमध्ये अशोक सराफांना मामा म्हटलं जातं. इतका मोठा कलावंत आहे, तर अशोक सर म्हणा…सख्खे मामा लागतात का तुझे? ही आपुलकी आपल्या घरात आणि चार भिंतीतच ठेवा. चारचौघांसमोर असाल तर तुम्हा त्यांना मान द्यायलाच हवा, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे, मात्र नाटकाबद्दल माझ्या मनात कायम कुतूहल आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकं यामध्ये नाटक हे सर्वात आव्हानात्मक माध्यम आहे असे मला वाटते. परदेशात गेल्यावर आपण मोठमोठी नाट्यगृह पाहतो. उत्तम दर्जाची नाटकं पाहतो. ती आपल्याकडे पण व्हायला पाहिजेत. त्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी प्रस्ताव तयार करावा. तुमची मागणी पूर्ण व्हावी म्हणून मी पुढाकार घेईल, असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.