मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला.
महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम ! अशा शब्दात राज ठाकरे व्यक्त झाले.
राम मंदिर उभारणीसाठी अनेक कारसेवकांनी प्रयत्न केले आहेत. बाबरी मशिद पाडण्यासाठी कारसेवकांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे आज राज ठाकरेंनी कारसेवकांचे आत्मे सुखावले असतील अशी भावना व्यक्त केली.
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाला आहे. श्रीराम विग्रहाचे प्रथम दर्शन झाले आहे. त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरासाठी चांदीचं छत्र अर्पण केलं. आणि पूजेनंतर श्रीरामाला साष्टांग नमस्कार करून अनुष्ठान पूर्ण केलं.