महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंच्या ‘युती’ प्रस्तावावर मनसेचा स्पष्ट नकार: संदीप देशपांडेंनी उघड केली उद्धव ठाकरे यांची डावपेचांची भूमिका

एक्स: @vivekbhavsar

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरून मनसेशी युतीबाबत दिलेले सकारात्मक संकेत हवेत विरले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ज्या थेट आणि आक्रमक भाषेत या प्रस्तावावर आपली भूमिका मांडली आहे, ती एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरचा अविश्वासच आहे. संदीप देशपांडे यांचे वक्तव्य हे केवळ राजकीय प्रतिक्रिया नाही, तर ते शिवसेना (उद्धव गट) च्या नेतृत्वावर केलेले जोरदार राजकीय आरोप आहेत.

देशपांडे यांनी अगदी सुरुवातीपासून रोखठोक विचारले आहे – “शरद पवार आणि काँग्रेससोबत जाताना कोणा शिवसैनिकांची मतं विचारात घेतली होती का?” शिवसेनेनं महाविकास आघाडीत सामील होतानाची पद्धत एकतर्फी होती, हा आरोप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत मांडला. संजय राऊतांनी चार महिन्यांपूर्वी आम्हाला विचारले होते, “बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का लावता?” आणि आज तेच माणसं ‘युती’ची भाषा बोलत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशपांडे यांचे सर्वात ठळक निरीक्षण म्हणजे, “२०१४ मध्ये आम्ही युतीचा प्रस्ताव दिला, तेव्हा का गप्प बसले?” हे विचारणं केवळ भूतकाळ उकरणं नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या हेतूंवर थेट शंका घेणं आहे. संदीप देशपांडे यांनी हे स्पष्ट केलंय की मनसे कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. उद्धव ठाकरे सध्या संकटात आहेत, पक्ष कमकुवत झाला आहे, म्हणून राज ठाकरे यांच्याशी ‘भावनिक’ संबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही भावना मनसेच्या वर्तुळात खोलवर आहे.

“जर उद्धवकडे आज ६० आमदार असते, तरी ते इतकेच सकारात्मक राहिले असते का?” असा स्पष्ट सवाल देशपांडे यांनी करून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रामाणिकतेवरच शंका उपस्थित केली आहे. त्यांचा आशय स्पष्ट आहे – ‘सकारात्मकता’ ही सत्तेच्या गणितावर आधारित आहे, निष्ठेवर नाही.

राज ठाकरेच निर्णय घेतील, पण कोणालाही मनसेवर दबाव टाकू देणार नाही, हे सांगून देशपांडे यांनी पक्षाची स्वतंत्र भूमिका कायम ठेवली आहे. हिंदी सक्तीविरोधी भूमिका, मराठी अस्मिता, रोजगार आणि स्थानिक प्रश्न हे मनसेचे मुख्य अजेंडे असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. म्हणजेच युती, आघाडी, संधीचं राजकारण सोडून मनसे ‘महाराष्ट्र पहिला’ या भूमिकेवर ठाम आहे.

एकंदरीत, उद्धव ठाकरे यांनी दिलेले युतीचे संकेत हे मनसेला सहानुभूतीच्या झोतात आणून स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न होता, हे संदीप देशपांडे यांनी बिनधास्तपणे उघड केलं आहे. ही प्रतिक्रिया केवळ युती नाकारणारी नाही, तर उद्धव ठाकरे यांच्यावरील अविश्वास आणि त्यांच्या सध्याच्या राजकीय दयनीयतेकडे बोट दाखवणारी आहे.

यातून एकच निष्कर्ष निघतो, ठाकरे–राज ठाकरे युतीचे सर्व दरवाजे सध्या तरी बंद आहेत. ही चर्चा फक्त मीडियात सुरू आहे, प्रत्यक्षात मनसे त्याला अजिबात गांभीर्याने घेत नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्यावर परत एकदा अविश्वास दाखवणार हे एक ठाम राजकीय प्रत्युत्तर आहे.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात