मुंबई : “मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही,” असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत उबाठा गटाला दिला.
शिंदे म्हणाले, “मराठी माणूस, मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण. पण तुमचं ‘म’ म्हणजे महापालिकेचा, मलिदा, मतलब आणि मतांचा आहे.” त्यांनी आरोप केला की, जनतेच्या मतांची माती करून आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपली भूमिका तपासावी.
२०१७ मध्ये भाजपने मुंबई महापालिकेचे महापौरपद शिवसेनेला दिलं, याचा गौप्यस्फोटही शिंदे यांनी केला. “फडणवीसांनी महापौरपद दिलं, पण २०१९ मध्ये दगा केला,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
“गुवाहाटीत असताना तुम्ही दिल्लीशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला, गद्दारी तुम्ही केली,” असा आरोप करत शिंदे यांनी एकतर्फी राजकीय सामना पुन्हा तापवला.