मुंबई : विधानभवनाच्या तळमजल्यावर गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारी प्रकरणावर आज पडळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली आणि “आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जी कारवाई होईल, त्याला न्यायालयात सामोरे जाऊ,” असे सांगितले.
पडळकर म्हणाले, “कालच्या घटनेबाबत मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली, त्यांना सक्त ताकीद दिली आहे. जी काय कारवाई होईल, ती स्वीकारू.”
जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ठिय्या आंदोलन केल्याचा उल्लेख करत पडळकर यांनी प्रश्न केला, “पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून कारवाई अडवणे ही गुंडगिरी नाही का?”
पडळकर पुढे म्हणाले, “हा विषय विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. अध्यक्ष आणि सभापती हेच सर्वोच्च आहेत. त्यांच्या भूमिकेवर मी काही बोलणार नाही.”
गुरुवारी सायंकाळी विधानभवनाच्या तळमजल्यावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांत झालेल्या जोरदार हाणामारीनंतर पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा तक्रार दाखल झाली.
आपली भूमिका स्पष्ट करत पडळकर म्हणाले, “आपण तेव्हाचे व्हिडिओ पाहू शकता. मी पायऱ्यांवर कोपऱ्यात कार्यकर्त्यांसोबत होतो. शरद पवार गटाचे नितीन देशमुख जवळ आले, त्यांची माझ्याशी ओळखही नाही. मी फक्त कार्यकर्त्यांसोबत छायाचित्र काढत होतो.”
ते पुढे म्हणाले, “काल लक्षवेधी सूचना होती, त्यामुळे दिवसभर सभागृहात होतो. मंत्री उपस्थित नसल्यामुळे लक्षवेधी सूचना रखडली आणि त्यामुळे सभागृहाबाहेर आलो.”