मुंबई : विधानभवन परिसरात काल घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विधानभवन सुरक्षा कार्यालयाने सर्व प्रकारचे प्रवेश पास तातडीने रद्द केल्याचे आदेश जारी केले गेले.
या निर्णयानुसार कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांना देखील प्रवेश दिला गेला नाही. फक्त विशेष परवानगी पत्र असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. कोणतेही सरकारी ओळखपत्र, स्टाफ पास किंवा वाहन पास वैध मानले गेले नाहीत.
काल नेमकं काय घडलं?
विधानभवनाच्या तळमजल्यावर गुरुवारी दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी आज विशेष दक्षता घेतली.
सुरक्षा यंत्रणांचा कडक निर्णय
विधानभवन परिसरातील वाढती गर्दी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख सुरक्षा उपाययोजना केल्या, अशी माहिती विधानभवन सुरक्षा कार्यालयाने दिली.