मुंबई : विधानभवनातील हाणामारी प्रकरणामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल करत सभागृहात खळबळ उडवली.
राज्यातील सरळसेवा शिक्षक भरतीमधील बिंदूनामावली घोटाळ्यावर लक्षवेधी सूचना मांडताना पडळकरांनी शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “१९६९ पासून बिंदूनामावली सुरु झाली. त्यानंतर अनेक बदल झाले. लाखोंच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. आरक्षण दिलं तरीही न्याय मिळत नाही, कारण प्रक्रिया पारदर्शक नाही. पण इथे प्रश्न विचारूही दिला जात नाही.”
तालिका अध्यक्षांनी त्यांना मुद्देसूद प्रश्न विचारण्यास सांगितले असता, पडळकर संतापले. “माझ्या प्रश्नाचे स्वरूप मोठे आहे. मला केवळ बाहेर येऊन बातमीसाठी बोलायचं नाही. जर वेळ नसेल तर माझी लक्षवेधी सूचना रद्द करा,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
पडळकर म्हणाले, “दोन-तीन लाख लोकांवर अन्याय झाला आहे. सरकारची भूमिका अशीच राहिली तर ती चुकीची आहे.”
यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना पडळकरांना टोला लगावत म्हटले, “तुम्ही वेळेवर उपस्थित नव्हता.”
त्यावर पडळकरांनी त्यांचे बोलणेच तोडले आणि वाद रंगला. मात्र भुसे यांनी नम्रपणे सांगितले, “तुम्ही नव्हता तरी मी थांबलो. आम्हालाही विषयाचे गांभीर्य आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करू.”
यावरून सभागृहात चांगलेच वाकयुद्ध पेटले. एका बाजूला पडळकरांचे कार्यकर्ते हाणामारी प्रकरणामुळे चर्चेत होते, तर दुसरीकडे शिक्षक भरती घोटाळ्यावरून मंत्र्यांना फटकारल्याने पडळकर पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.