X: @therajkaran
मुंबई: बेधडक वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार (Amravati News) नवनीत राणा (Navneet Rana) यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीहीं नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आरोपीने राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून त्यांना मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी पाकिस्तान (Pakistan) किंवा अफगाणिस्तान (Afganistan) मधून देण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस (Amravati Rajapeth Police) ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
आज पुन्हा धमकी देण्यामागे कुणाचा हात आहे याचा खासदार राणा यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणी एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. संसदेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे राणा यांनी म्हंटले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यात राणा यांना धमकी देणाऱ्या श्याम तायवाडे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही, अशी धमकी आरोपी तायवाडे (Tayvade) यांनी दिली होती. आरोपीने, त्यांच्या आई वडिलांच्या नावावर असलेल्या सीम कार्डचा वापर करत राणा यांना अश्लील शिवीगाळ केली होती. पोलिसांनी नेरपिंगळाई येथून आरोपीला अटक केली होती.
या धमकीप्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय साहाय्यक विनोद गुहे (Vinod Guhe) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
Also Read: अजितदादांना धक्का : पक्षातील पदाधिकाऱ्यांसह 137 जणांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश