खासदार संजय राऊत यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा
Twitter: @NalavadeAnant
मुंबई: शिवसेना उध्दव ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे नेते व खा. संजय राऊत यांची आरोपांची राळ काही थांबण्याचे नावच घेत नाहीये. नसून त्यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्यावर प्रखर शब्दात निशाणा साधत ‘ हे तर अन्य राज्यांच्या निवडणुकांसाठी खोके पोहचविणारे सुलतान’ असा जबरदस्त हल्लाबोल चढवला.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थान आणि तेलंगणा तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अन्य राज्यांत त्या त्या राज्यांतील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या जाहीर प्रचार केला होता. प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकांत आपले उमेदवार दिले नसले तरी त्यांनी काही निवडक ठिकाणी अपक्ष उमेदवार तर काही ठिकाणी थेट मित्र पक्ष भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जो शिवराळ भाषेचा शब्दप्रयोग केला गेला, त्यानंतरच दोन्हीं गटाच्या समर्थकांकडून एकमेकांवर आरोपांचा कलगीतुरा रंगला, त्यात मग खा. राऊत यांनीही उडी घेत पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवण्यास सुरूवात केल्याचे त्यांच्या आजच्या टीकेवरून दिसून येत असल्याचे मानले जाते.
खा. राऊत म्हणाले, राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य माणूस दुष्काळ व अवकाळी पावसाने हवालदिल झालेला असताना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निवडणूक पर्यटन सुरू आहे. या राज्यांतील हे दोन सुलतान अन्य राज्यांतील प्रचारात मग्न आहेत. फक्त या निवडणुकांत खोके पोहचविणाचे काम हे दोन्ही सुलतान इमाने इतबारे करतं आहेत. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याची त्यांना चिंता नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
त्याचवेळी येत्या ३१ डिसेंबर नंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार करत, राऊत म्हणाले, आम्हाला देखील वाटते की, अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे, कारण येत्या ३१ डिसेंबर पर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिल्याने मुख्यमंत्री पद रिकामे होणार आहे. त्यामूळे त्या जागेवर जर अजित पवार बसले तरं आम्हालाही त्याचा आनंदच होईल, अशी मार्मिक टिप्पणी ही त्यांनी केली.