Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील येड्याच्या सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राज्य शासनाने शासन आदेश काढून मंत्रालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर आणि वेगवेगळ्या विभागात जाण्यावर बंधने आणली आहेत. याबाबत टीका करताना नाना पटोले यांनी कोणाचेही नाव न घेता मुख्यमंत्री कार्यालय चलवणाऱ्या दलालावर टीका केली आहे. पटोले म्हणाले, जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु असून अशा दलालांना मंत्रालयात मुक्त वावर आहे आणि सर्वसामान्य जनतेला निर्बंध लावले जात आहेत. सरकारच्या या दलालाचा भांडाफोड आम्ही लवकरच करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील शिंदे सरकारला आता केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली असून, मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी व केवळ जाहीरातबाजी केली जात असुन प्रत्यक्षात या कार्यक्रमातून काही साध्य होत नाही म्हणून तर लोक मंत्रालयात येतात. काम होत नाही म्हणूनच आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलतात, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मर्यादित करणे त्यासाठी जाचक अटी घालणे ही हुकूमशाही प्रवृत्ती आहे. हे जाचक नियम लागू न करता सर्व सामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा.
पटोले म्हणाले की, केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. गुजरातमध्ये एक हुकूमशाही व्यवस्था सुरु झाली तीच व्यवस्था २०१४ पासून केंद्रात आली आणि आता हीच हुकूमशाही व्यवस्था महाराष्ट्रात आली आहे.