X: @therajkaran
मुंबई: येत्या जून महिन्यात होऊ घातलेली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्ष लढवेल, असे परस्पर जाहीर करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची सांगली जागा परस्पर जाहीर केल्याचा बदला घेतला असे मानले जात आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ २०१८ मध्ये एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने त्यांनी लढविली होती. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नजीब मुल्ला हे त्यावेळी उमेदवार होते.
काँग्रेसने येथे निवडणूक लढविण्याची परस्पर घोषणा केली असली तरी २०२८ मध्ये याच मतदारसंघाची जागा एकत्रित शिवसेनेनेही लढविली होती. त्यांचे उमेदवार होते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पक्ष सचिव व ठाणे मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे. त्यावेळी भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले होते, तरी मोरे यांना मिळालेली मतेही दखल घेण्याजोगी होती.
शिवसेनेतील फुटीनंतर उध्दव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेले. आज अधिकृत शिवसेना ही मुख्यमंत्री शिंदे यांची असली तरी आणि उध्दव ठाकरे हे आज महाविकास आघाडीत असले तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघावर दोघेही दावा करतील, ही शक्यता जास्त असल्याचे व सांगलीची पुनरावृत्ती येथेही होऊ शकते असे मत एका राजकीय विश्लेषकाने नोंदवले आहे.
या विश्लेषकाच्या मते उध्दव ठाकरे यांनी आपल्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत नेहमीच दुहेरी भुमिकाच घेतली आहे. स्वतः समंजसपणाची भूमिका घ्यायची व त्यांना जे पाहिजे ते त्यांचे निकटवर्तीय खा. संजय राऊत यांच्याकडून करून घ्यायचे हाच त्यांचा खरा राजकारणातील चेहरा राहिलेला आहे. ज्यांनी उध्दव ठाकरे यांच्या या स्वभावाचा फटका सहन केला आहे, तोही आजघडीला याच मतावर ठाम असल्याचे या राजकीय विश्लेषकाने ठामपणे सांगितले. एकंदरीतच काय तर उध्दव, आदित्य व राऊत या त्रिकुटाच्या होकारावर जो विसंबून राहिला त्याचा कार्यभार आटोपला असेही त्यांनी यावेळी बोलताना ठामपणे स्पष्ट केले.
आज जरी वरवर काँग्रेसने या मतदारसंघासाठी आपणच निवडणूक लढवणार असे परस्पर जाहीर केले असले आणि भलेही उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसला शब्द दिला असला तरी या मतदारसंघात ज्याची “इच्छा” जास्त त्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत ऐनवेळी आपला उमेदवार जाहीर करतील, पण आताच नाही. तर जसे लोकसभेच्या निकालात उध्दव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा वरचढ झाली तर या दोघांनाही कॉर्नर केल्याशिवाय राहणार नाही, असाही ठाम दावा या राजकीय विश्लेषकाने आमच्या प्रतिनिधीशी नाव न छापण्याच्या अटीवर केला.