महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या विकासाचा ‘बूस्टर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती…..?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील मेट्रो, उन्नत मार्ग आणि इतर पायाभूत प्रकल्पांच्या कार्यक्रमात उपस्थित असताना मंचावरील दृश्य.

२०२७ पासून मेट्रोसदृश आधुनिक लोकलची सुरुवात; चेंबूर मेट्रो, सांताक्रूझ-चेंबूर उन्नत मार्ग आणि ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाला गती

MMRDAचा कार्यक्रम, पण अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर….

मुंबई — मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईकरांसमोर विकासकामांची मोठी यादीच मांडली. त्यात २०२७ पासून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत मेट्रोच्या धर्तीवरील आधुनिक वातानुकूलित लोकल दाखल होण्याची सुरुवात, चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण, सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्गाच्या महत्त्वाच्या उन्नत मार्गिकेचे उद्घाटन आणि ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गातील ‘अर्जुना’ टीबीएमचा शुभारंभ—या प्रकल्पांमुळे मुंबईच्या दळणवळणाला ‘गतिमानतेचा बूस्टर’ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पण या विकासाच्या सोहळ्यापेक्षा एक वेगळाच राजकीय प्रश्न मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. तो म्हणजे—MMRDAचा कार्यक्रम आणि MMRDAचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित का…..?

सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि MMRDAचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे MMRDAशी निगडित इतक्या मोठ्या प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमातील त्यांची अनुपस्थिती हा केवळ औपचारिक प्रोटोकॉलचा विषय न राहता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे.

मात्र शिंदे यांच्या अनुपस्थितीचे कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसल्याने त्यामागे नाराजी, मतभेद किंवा श्रेयाचे राजकारण असल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. तरीही राजकीय प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे.

चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण पूर्व मुंबईतील रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो जोडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

‘विकासाचा चेहरा’ कोणाचा….? हाच खरा राजकीय प्रश्न

मुंबईतील पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे केवळ वाहतूक सुधारण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; ते आता मुंबईच्या राजकारणातील महत्त्वाचे राजकीय भांडवल बनले आहेत.

कारण मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सिग्नलमुक्त जोडमार्ग आणि आधुनिक लोकल या प्रत्येक प्रकल्पाचा थेट संबंध मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. त्यामुळे “मुंबई बदलत आहे” हा संदेश कोणाच्या नेतृत्वाखाली दिला जातो, यालाही राजकीय महत्त्व आहे.

गुरुवारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व प्रकल्पांचे महत्त्व आपल्या भाषणातून ठळकपणे मांडले. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने मुंबईच्या विकासाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाला देण्याची संधी निश्चितच निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, MMRDAच्या अधिकृत रचनेनुसार नगरविकास मंत्री हेच प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे “विकासकामांचे श्रेय आणि राजकीय दृश्यता यांचे गणित” हा मुद्दा चर्चेत येणे स्वाभाविक आहे.

शिंदेंच्या अनुपस्थितीने काय संदेश गेला…?

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपकडे असले, तरी मुंबई महानगराच्या विकासाच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका आणि एकनाथ शिंदे यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

यापूर्वी MMRDAच्या विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये फडणवीस आणि शिंदे एकत्र दिसले आहेत. म्हणूनच गुरुवारच्या कार्यक्रमातील शिंदे यांच्या अनुपस्थितीने तीन प्रश्न पुढे आले आहेत.

मुंबईच्या विकासाचे राजकीय श्रेय कोण घेणार…?

MMRDAच्या कामांच्या राजकीय मांडणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची भूमिका किती स्वतंत्र राहणार…?

आणि मुंबईतील विकासकामे ही महायुतीची संयुक्त उपलब्धी म्हणून मांडली जाणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे त्याचे श्रेय घेणार…?

या प्रश्नांची उत्तरे आज मिळाली नसली, तरी पुढील राजकीय हालचालींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा संकेत ठरू शकतो.

सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्गाच्या विस्तारातील महत्त्वाचा दुवा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून बीकेसी आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

२३८ आधुनिक एसी लोकल; पहिली गाडी २०२७ पासून….

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील सर्वात मोठ्या प्रस्तावित बदलांपैकी एक म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी २३८ आधुनिक वातानुकूलित उपनगरीय लोकलचा उल्लेख केला.

या २३८ लोकल भारतीय रेल्वेच्या उत्पादन केंद्रांमध्ये तयार केल्या जाणार असून, पहिल्या नव्या लोकल २०२७ पासून मुंबईच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण ताफा टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित डबे, स्वच्छता आणि आधुनिक सुविधा असलेल्या या लोकलमुळे मुंबईच्या पारंपरिक लोकल प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील लाखो प्रवासी दररोज उपनगरीय रेल्वेवर अवलंबून असल्याने हा बदल प्रत्यक्षात उतरला, तर तो मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात मोठ्या परिवर्तनांपैकी एक ठरू शकतो.

चेंबूर मेट्रो : रेल्वे-मोनोरेल-मेट्रोची ‘त्रिसूत्री’ जोडणी….

चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण हा पूर्व मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या परिसरात उपनगरीय रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो अशा तीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांची जोडणी अधिक सुलभ होणार आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन-पनवेल महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग यामुळे या स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

यावर्षी मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन मेट्रो मार्गिका सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

बीकेसीची वाहतूक कोंडी कमी करण्याचा महत्त्वाचा दुवा…..

भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन हा सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्गाच्या विस्तारातील महत्त्वाचा अंतिम दुवा ठरणार आहे.

या मार्गामुळे बीकेसी आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार असून कलिना, वाकोला आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रवासाच्या वेळेतही लक्षणीय बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतःच या जोडमार्गांच्या उतरणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता मान्य करून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

म्हणजेच नवा मार्ग उभारला म्हणजे वाहतूक प्रश्न पूर्णपणे सुटला, असे चित्र अद्याप नाही.

ठाणे-बोरिवली : ‘अर्जुना’च्या भुयारी प्रवासाला सुरुवात…..

ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग हा मुंबई महानगराच्या वाहतूक नकाशावरील गेमचेंजर प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.

या भुयारी जोडणीमुळे ठाणे आणि बोरिवली यांच्यातील विद्यमान प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

पहिल्या बोगद्यासाठी ‘नायक’ टीबीएम यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे. आता दुसऱ्या बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएम सुरू झाल्याने दोन्ही बोगद्यांचे काम समांतरपणे पुढे जाणार आहे.

या प्रकल्पामुळे ठाणे आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचे गणितच बदलण्याची शक्यता आहे.

बाबासाहेब भोसले यांच्या नावाने उड्डाणपुलाला नवी ओळख….

बीकेसीच्या जी-ब्लॉकला पूर्वेकडील जोडमार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाला माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्यात आले.

त्यांच्या कार्यकाळातील स्वातंत्र्यसैनिकांसाठीच्या योजना, चंद्रपूरचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण आणि संभाजीनगर खंडपीठ यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी खास उल्लेख केला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आमदार प्रवीण दरेकर, राजहंस सिंह आणि अबू आजमी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

MMRDAचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविक केले, तर अतिरिक्त महानगर आयुक्त पी. वेलारासू यांनी आभार मानले.

मात्र उपस्थितांच्या या यादीपेक्षा राजकीय वर्तुळात अधिक चर्चेत राहिलेले नाव होते—अनुपस्थित असलेले MMRDAचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

विकास झाला; आता श्रेयाचे राजकारण…?

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला या प्रकल्पांमुळे निश्चितच मोठा फायदा होऊ शकतो. आधुनिक लोकल, मेट्रोची वाढती व्याप्ती, सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग आणि ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग हे मुंबईच्या भविष्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प आहेत.

पण राजकारणाच्या पातळीवर या विकासकामांची दुसरी बाजूही आहे.

मुंबईकरांना विकासाचा अनुभव देणे ही महायुतीसाठी मोठी राजकीय संधी आहे. भाजपला याचा फायदा असा की, मुंबईच्या पायाभूत विकासाचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अधिक ठळक करता येईल.

तर दुसरीकडे शिवसेनेला तिच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभाग आणि MMRDAशी संबंधित प्रकल्पांची कामगिरी मुंबईकरांसमोर मांडता येईल.

पण धोका देखील तितकाच स्पष्ट आहे.

जर विकासाचे श्रेय दोन मित्रपक्षांमध्ये विभागले गेले नाही आणि एकाच पक्षाने ते पूर्णपणे आपल्या खात्यावर घेतले, तर महायुतीच्या अंतर्गत राजकीय स्पर्धेला धार येऊ शकते.

त्यामुळे गुरुवारच्या कार्यक्रमाने विकासाचा मोठा संदेश दिला खरा; पण त्याचवेळी एक राजकीय प्रश्नही मागे ठेवला—

मुंबईच्या विकासाला ‘बूस्टर’ मिळाला खरा; पण महायुतीच्या समन्वयाला ‘ब्रेक’ तर लागला नाही ना….?

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात