मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणारी २५ टक्के सवलत रविवार, २३ नोव्हेंबरपासून अधिकृतपणे लागू होत आहे. सवलतीची घोषणा होऊन दीड महिना उलटूनही ती प्रत्यक्षात सुरू न झाल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
एमएमआरसीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सवलत प्रणालीत समाविष्ट करण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आवश्यक चाचण्या पूर्ण होताच सवलत संपूर्ण मेट्रो प्रणालीमध्ये सुरळीतपणे लागू केली जाईल. तांत्रिक अडथळे राहू नयेत म्हणून सर्व प्रक्रिया युद्धस्तरावर केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाठपुराव्याचे यश : दिव्यांग प्रवाशांचा ‘आवाज’ पोहोचवणारे दिपक कैतके
मेट्रो-3 सुरू झाल्यापासून दिव्यांगांना सवलत लागू न झाल्याचा मुद्दा सतत पुढे आणत, वरिष्ठ पत्रकार, रुग्णमित्र आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत त्यांनी दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी, अडथळे आणि मागण्या प्रभावीपणे मांडल्या.
त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, एमएमआरसीने सवलत लागू करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
हजारो दिव्यांगांसाठी मोठा दिलासा
सवलत लागू झाल्याने मुंबईतील हजारो दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. दैनंदिन प्रवासाचा खर्च कमी होणार असून मेट्रोवरील त्यांचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याचवेळी, लिफ्ट अकार्यक्षम राहणे, दिव्यांग अनुकूल व्यवस्था अपुरी असणे, स्टेशनवर आवश्यक सुविधा नसणे या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मिळणारी ही सवलत दिव्यांग प्रवाशांसाठी सकारात्मक टप्पा मानली जात आहे.
दिपक कैतके यांचा निर्धार : “२५% नाही, पूर्ण सवलत मिळेपर्यंत लढा सुरूच”
सवलत लागू झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिपक कैतके म्हणाले, “ही तर केवळ झांकी आहे… दिव्यांग व्यक्तींना मेट्रोमध्ये पूर्ण सवलत मिळेपर्यंत आणि मेट्रो प्रवास खऱ्या अर्थाने दिव्यांग-सुलभ होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार. हा संघर्ष अजून संपलेला नाही.”
दिव्यांग प्रवाशांच्या मूलभूत प्रवास हक्कासाठी सुरू असलेला त्यांचा लढा पुढेही तेवढ्याच दृढतेने सुरू राहील, असा त्यांनी पक्का निर्धार व्यक्त केला.

