मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून शहराला दररोज करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५६५ दशलक्ष लिटर इतकी तूट असल्याची माहिती आज विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात उघड झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून गारगाई धरण प्रकल्प आणि निक्षारीकरण (डिसॅलिनेशन) प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली.
भाजपचे ज्येष्ठ आमदार योगेश सागर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विशेषतः झोपडपट्ट्या आणि डोंगराळ भागातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, ज्या चाळी किंवा इमारतींमध्ये साठवण टाकीची क्षमता उपलब्ध नाही, अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या जलवितरण जाळ्यांमधून थेट पाणीपुरवठा करण्यात येतो.
तसेच जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली असून ११,५४० गळतीची ठिकाणे शोधून ती बंद करण्यात आली आहेत. याशिवाय जीर्ण झालेल्या ५८ किलोमीटर लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या असल्याची माहितीही उत्तरात देण्यात आली.
दरम्यान, भविष्यातील पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करून महानगरपालिकेमार्फत गारगाई धरणातून ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प तसेच २०० दशलक्ष लिटर क्षमतेचा निक्षारीकरण प्रकल्प राबविण्यात येत असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

