महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur : झिरो माईल’ होणार पर्यटकांचे आकर्षण केंद्र

मुंबई : नागपूर महानगराच्या समन्वित आणि चौफेर विकासासाठी आखलेली कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पांतर्गत परफॉर्मन्स गॅलरी, ‘झिरो माईल’ सौंदर्यीकरण, कॉटन मार्केट आणि फुल मार्केट विकास, तसेच कारागृह स्थलांतरण आदी योजनांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी संबंधित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी ‘झिरो माईल’ परिसराचा ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोन लक्षात घेऊन तो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार, असा विकास करण्याचे निर्देश दिले. अखंड भारताच्या केंद्रबिंदूचा इतिहास दर्शवणारे ‘एक्सपीरियन्स सेंटर’ येथे उभारण्यात येणार असून सुमारे ₹४५ कोटींच्या प्रकल्पांतर्गत संग्रहालय, नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून गॅलरी, सुविधा केंद्र आणि वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे. भविष्यात या केंद्राचे व्यवस्थापन मनपाद्वारे करण्यात येणार आहे.

कामठीत ७ हजार कंत्राटी कामगारांसाठी घरे

कामठी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७ हजार कंत्राटी कामगारांसाठी गृहप्रकल्प राबवण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने हे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. शासकीय मुद्रणालयाच्या जागेच्या पुनर्विकासाबाबतही निर्णय घेण्यात आला असून तेथे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कार्यालयही प्रस्तावित आहे.

ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात परफॉर्मन्स गॅलरी आणि अकॅडमी

या प्रकल्पात २० हजार चौ.मी. क्षेत्रात ६.२ लाख चौ.फूट जागेच्या विकासास मान्यता मिळाली असून त्यापैकी १.२ लाख चौ.फुट जागेत सभागृह उभारण्यात येणार आहे. उर्वरित जागेत विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

नवीन कारागृहासाठी बाबुलखेडा परिसर निवडला

नागपूरचे सध्याचे कारागृह स्थलांतरित करून बाबुलखेडा (कामठी तालुका) येथील ८१.६ एकर जागेवर नवीन कारागृह उभारण्यात येणार आहे. या संदर्भात दिल्ली, तळोजा व पालघर येथील आधुनिक कारागृहांचा अभ्यास करून प्रकल्प साकारण्यात येईल.

बसस्थानकांचे पुनर्विकास आणि बाजारपेठा सुशोभीकरण

मोरभवन व गणेशपेठ बसस्थानकांचे पुनर्विकास, तसेच डिक दवाखाना, कॉटन मार्केट, दहीबाजार, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट आदी परिसरांचे सुशोभीकरण करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

’नवीन नागपूर’ प्रकल्पास तत्वतः मान्यता

‘नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यात स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान व सेवा क्षेत्रांसाठी विशेष सुविधा असणार आहेत.

या प्रकल्पातील वैशिष्ट्य म्हणजे भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली, डिस्ट्रिक्ट कूलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू व टेलिकॉम सुविधा यांचा एकत्रित पुरवठा. खोदकामविरहित आणि भविष्यातील गरजांना अनुरूप असे हे स्मार्ट शहर नागपूरच्या आर्थिक स्थानाला नवे परिमाण देणारे ठरणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात