महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

१ लाख ७२ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान

मुंबई:  मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर विभूतींनी येथे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

ते मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात बोलत होते. हा कार्यक्रम सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह, फोर्ट येथे पार पडला. यावेळी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, तसेच अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा प्रभाव

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम धोरण आहे. या धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. विज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश होऊन सर्वांगीण विद्यार्थी घडतील.“

“२१व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्यांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षणामुळे आत्मज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडेल, असेही मंत्री पाटील म्हणाले.

कुतूहल व नवोपक्रमच भारताच्या प्रगतीचा पाया – डॉ. अजय कुमार सूद

या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. अजय कुमार सूद म्हणाले की, भारतीय युवक आज जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत आहे. कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहेत.

शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज, प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एस-लाइफ फ्रेमवर्क’ची संकल्पना मांडत त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नाते, संशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरण, विज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.

भारत सरकारचा ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधनाचे लोकशाहीकरण करत असून लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0 च्या माध्यमातून आरोग्य, शेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

१ लाख ७२ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदव्या

या वर्षीच्या दीक्षान्त समारंभात विविध विद्याशाखांतील १,७२,५२२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

• मुले – ८४,३१८

• मुली – ८८,२०२

• इतर – ०२

पदवी अभ्यासक्रम :

• एकूण – १,४९,९८२

• मुले – ७४,७२९

• मुली – ७५,२५२

पदव्युत्तर अभ्यासक्रम :

• एकूण – २२,५४०

• मुले – ९,५८९

• मुली – १२,९५०

• इतर – ०१

पीएचडी पदव्या

यावर्षी ६०२ विद्यार्थ्यांना पीएचडी पदव्या प्रदान करण्यात आल्या.

• विज्ञान व तंत्रज्ञान – २६९

• वाणिज्य व व्यवस्थापन – १४५

• मानवविद्या – १०९

• आंतर-विद्याशाखीय – ७९

विद्यापीठ परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ सुवर्णपदके देण्यात आली. त्यात १२ मुली व ७ मुलांचा समावेश आहे. याशिवाय दोन विशेष पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरवर उपलब्ध

दीक्षान्त समारंभानंतर विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

ज्यांचे ABC ID खाते तयार आहे, त्यांच्या गुणपत्रिका आणि क्रेडिट्सही डिजिलॉकरवर उपलब्ध होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात