By देवेंद्र भुजबळ
सानपाडा, नवी मुंबई : ठाणे महापालिकेप्रमाणे नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा, अधिकाऱ्यांना जाब विचारता यावा, अशा धर्तीवर नवी मुंबई महापालिकेचा कारभार लोकाभिमुख करण्याचा निर्धार खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी नवी मुंबई महापालिकेतील काही साचेबंद कारभारावर टीका करत काही अनुभव शेअर केले.
“सिडकोने बहुतांश पायाभूत सुविधा उभारलेल्या या शहरात, महापालिकेवर देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आहे. पण काही ठिकाणी डासांची समस्या असूनही महापालिकेने ती आपली जबाबदारी नसल्याचे सांगून उपाययोजना करण्यास नकार दिला. डासांना हद्दी समजत नाहीत, मग नागरिकांचा त्रास कोण सोसणार?” असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. ही बाब सचिव स्तरावर गेल्यावरच मार्गी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खा. म्हस्के म्हणाले, “निवडणुकीपूर्वी या ज्येष्ठ नागरिक संघाला भेट देण्याचे वचन दिले होते, आज ते पूर्ण करत असल्याचा आनंद आहे.” ज्येष्ठ नागरिक हे आपल्या आईवडिलांप्रमाणे असल्याने त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना खा. म्हस्के यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी १३५० सदस्य असलेल्या संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य संवादक अलका भुजबळ यांनी खा. म्हस्के यांच्या हस्ते ३ जानेवारी २०२४ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याची आठवण करून दिली. तसेच एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना सानपाडा येथे थांबा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी ‘आम्ही अधिकारी झालो’ व ‘करिअरच्या नव्या दिशा’ ही दोन पुस्तके खा. म्हस्के यांना भेट दिली आणि ती युवकांपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, नवी मुंबई युवा सेनेचे उपाध्यक्ष अविनाश जाधव, महिला आघाडी संघटक सुरेखा गव्हाणे आदी मान्यवरांची भाषणे झाली.
प्रास्ताविक संघाचे सचिव शरद पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष जी. व्ही. मुखेकर यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.