महाराष्ट्र ताज्या बातम्या

Stock Exchange: कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे जारी केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी- चिंचवड ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॅा. के गोविंदराज,बॅाम्बे स्टॅाक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटातच १०० कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली. त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. यावरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी ५ वर्षांचा असून त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

शेअर बाजारात कर्जरोखे ‘ लिस्टिंग ‘ करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ‘ कॉर्पोरेट’ अटी शर्तींची पूर्तता करीत ‘ लिस्टिंग’ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निधीतून पायाभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे . ही कामेही हरित पद्धतीची, पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे २० कोटीचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केले. कार्यक्रमपूर्वी बेल वाजवून कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात आले.

हरित कर्ज रोख्यांविषयी थोडेसे..

हरित कर्ज रोख्यांद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे इश्यु करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरु होताच केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून ‘एए +’ (AA+) पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात