महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ निहाय निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने समाविष्ट…..!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा महाराष्ट्र घोषणापत्र या नावाने बुधवारी येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली आहेत.

महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यात बदल घडवणार्‍या योजना जाहीर केल्या.त्या योजना निव्वळ घोषित न करता त्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारने उत्तम पध्दतीने केला असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदारसंघात एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार,गोंदियामधून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, तरं नाशिकमधून ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे यावेळी सहभागी होते.तर प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना लढवत असलेल्या मतदारसंघातील उमेदवारही यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे जाहीर केले आहे. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे.शिवाय अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले.

तर यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापनेनंतर १०० दिवसात नवीन महाराष्ट्राचे व्हिजन जाहीर करु असे बारामतीतून बोलताना स्पष्ट केले.

आज प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक स्टायपेंड,अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन,सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीजबिल ३० टक्के कमी करण्यात येणार आहे.त्याचवेळी अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवरही आळा, वृध्द पेंशन धारकांना महिन्याला २१०० रुपये अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.

शिवाय यामध्ये लाडकी बहीण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज,५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर,आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश, गरीब,मध्यमवर्गीय, युवक,महिलांच्या कल्याणासाठी… या जनतेच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक योजनांचा समावेश केला असून या योजनांना फार मोठा प्रतिसाद राज्यातील कानाकोपऱ्यातून मिळाल्याचे स्पष्ट करत विशेष म्हणजे या सर्व योजना कुटुंब असेल किंवा युवक, महिला-भगिनींना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजना जनतेच्या मनात खोलवर गेल्याचा दावाही खा.तटकरे यांनी यावेळी बोलताना केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे ३६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्रवादी घोषणापत्र असे छापण्यात आले असून आपल्या मतदारसंघातील विकासकामे आणि घोषणापत्रांच्या माहितीसाठी ९८६१७१७१७१ हा हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव,स्टार प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे कोषाध्यक्ष आ.शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे,मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे आदी उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात