आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? असा खडा सवाल करत यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून २४ तासाच्या आत वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु,असा इशारा प्रदेश काँग्रेसने बुधवारी राज्य सरकाराला दिला.
आज टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की,रश्मी शुक्ला यांना मिळालेली मुदतवाढ ही फक्त पोलीस महासंचालक पदासाठीच होती,दुसऱ्या कोणत्याही पदासाठी नाही.त्यातच त्यांनी वयाची ६० वर्षही पूर्ण केलेली असून ज्याक्षणी निवडणूक आयोगाने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले त्याक्षणी त्या कायद्यानुसार निवृत्त झालेल्या आहेत.असे असताना त्यांना रजेवर कसे पाठवले जाते, अशीही संतप्त विचारणा लोंढे यांनी केली.
महाराष्ट्रात एकच अधिकारी सरकारच्या सर्वात लाडक्या आहेत का?अशी विचारणा करत रश्मी शुक्लाच का, दुसरे अधिकारी नाहीत का,सदानंद दाते, रितेशकुमार,संजय वर्मा,विवेक फणसाळकर हे सक्षम अधिकारी नाहीत का? ६० वर्ष झाल्यांनतरही एकाच व्यक्तीसाठी आग्रह का,याचे उत्तर आता मुंबई भाजप अध्यक्ष ॲड.आ.आशिष शेलार यांनी द्यावे,अशी मागणीही लोंढे यांनी केली.
रश्मी शुक्ला निवृत्त झाल्या तरी त्यांच्यासाठी वेगळा कायदा लावला जातो,कायद्याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना नियुक्ती दिली जाते.रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यासाठी सर्व कायदे, नियम,संविधान, सुप्रीम कोर्टाचा निकाल बाजूला ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकार करत आहे.रश्मी शुक्ला यांच्या मदतीने निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा भाजपा युती सरकारचा हा प्रयत्न असून पोलीस वाहनातूनच भाजपा महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवले जाते अशी माहिती मिळाल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगत आहेत यातच रश्मी शुक्लाच का,याचे उत्तर दडल्याचा आरोपही लोंढे यांनी केला.