महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCP: घड्याळ तेच, जागा तीच… पण उद्घाटन नव्याने!; महाड राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा उद्घाटन सोहळा तटकरे यांच्या उपस्थितीत — पुन्हा राष्ट्रवादीचा बोलबाला

महाड – महाड विधानसभा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राजकारण चैतन्यमय होताना दिसत आहे. माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर पक्षाने महाडमध्ये नव्या जोमाने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

पूर्वीचेच कार्यालय, तीच जागा – पण नव्या रूपात सजलेले राष्ट्रवादीचे हे कार्यालय ११ ऑक्टोबर रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. “घड्याळ तेच, जागा तीच, पण उद्घाटन नव्याने,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांमध्ये या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

स्नेहल जगताप यांच्या प्रवेशानंतर महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नव्या उमेदीने तयारीला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्षाने महाडसह संपूर्ण तालुक्यात संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे.

या वेळी महाड नगरपरिषदेची निवडणूक रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व पक्ष आपली ताकद आजमावणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली मोठी स्थानिक चाचपणी असल्याने सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक नितीन पावले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगरसेवक सुदेश कळमकर यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मात्र दोन गट असल्याने एका गटाकडून मंगेश देवरुखकर, तर दुसऱ्याकडून माजी विरोधी पक्षनेते चेतन (बंटी) पोटफोडे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपने आपले पत्ते अजून उघड केलेले नसले तरी, महाडमधील काही जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपचे मूक समर्थन मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात पालकमंत्री पदाच्या मुद्यावरून चुरस वाढली आहे. या मुद्यावरून दोन्ही पक्ष विकासाचे श्रेय मिळवण्याच्या प्रयत्नात असून, परस्परांवर टीका-प्रत्युत्तरांचा जोर वाढला आहे.

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी भाजपचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून महाडमध्ये तणाव निर्माण झाला होता. दळवी समर्थकांनी महाडमध्ये येऊन देशमुख यांना इशारा दिला होता. या प्रकरणावर अद्याप राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, ११ ऑक्टोबर रोजी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यालय उद्घाटनावेळी यावर प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.

एकंदरीत, “घड्याळ तेच, जागा तीच – पण उद्घाटन नव्याने” अशा घोषणेसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार येथे सुरू करणार आहे. या नवीन कार्यालयातूनच जिल्ह्याच्या राजकीय रणधुमाळीची बीजे रोवली जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात