NEET आणि CBSE कथित पेपरफुटीविरोधात मुंबईत ‘युवा आक्रोश मोर्चा’; शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग
मुंबई : NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे ‘युवा आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब प्रमुख उपस्थित होते.
चैत्यभूमी, दादर येथून शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या मोर्चात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार होणाऱ्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांच्या अपेक्षांवर पाणी फिरत असल्याचे ते म्हणाले.
“परीक्षा व्यवस्थेतील या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी चिब यांनी केली. तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकार या गंभीर प्रश्नावर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी मंत्री नसीम खान यांनीही सरकारवर टीका करताना म्हटले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या घटना या केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचे उदाहरण नसून शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहेत. देशातील युवकांमध्ये वाढत्या असंतोषाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
आमदार भाई जगताप यांनी सरकारवर निशाणा साधताना, “एकीकडे युवकांना मोठमोठी आश्वासने दिली जातात, तर दुसरीकडे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घोटाळ्यांवर प्रभावी कारवाई होत नाही. पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. “देशातील परीक्षा व्यवस्था गुणवत्तेवर आधारित असली पाहिजे. मात्र आज गैरव्यवहार आणि पैशांच्या जोरावर काही जण विद्यार्थ्यांचे भविष्य हिरावून घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे,” असे ते म्हणाले.
आंदोलनादरम्यान “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. “विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरू राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

