Twitter : @milindmane70
मुंबई
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रस्त्याचे काम सध्या संथ गतीने सुरू असून या कामामुळे महामार्गावर पेंडपासून महाडपर्यंत खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे वर्णन या महामार्गाचे केल्यास वावगे ठरू नये. या कामांमध्ये मूळ रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती देखील ठेकेदाराने करायची आहे. मात्र, पैसे वाचवण्याच्या हेतूने ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदार खड्डे भरत नाहीत आणि अधिकारी खड्डे भरून घेत नाहीत यामागे कोणते आर्थिक गणित लपले आहे? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी वर्गाला पडला आहे ? या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य माणूस आणि वाहन चालकांचे मात्र कंबरडे मोडत आहे. परिणामी या महामार्गावर जम्पिंग जपाकचा अनुभव मिळत आहे.
मागील पंधरा वर्षापासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहन चालकांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीला कार्यारंभ आदेश देताना रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची अट टाकली जाते. या खर्चाचा समावेश देखील निविदा प्रक्रियेत केला जातो. यामुळे मूळ रस्त्यावरील खड्डे भरणे आणि रस्ता सुस्थितीत ठेवणे हे ठेकेदाराचे काम आहे. मात्र, ठेकेदार पैसे वाचवण्यासाठी या खड्ड्याकडे दुर्लक्ष करत आहे.
रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांची असते. मात्र, नागरिक आवाज उठवत नसल्याने ठेकेदार या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले जाते, त्याने रस्ता वाहतुकीस सुरक्षित ठेवला पाहिजे. याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, या महामार्गावर सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही.
महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांची अवस्था बिकट झाली आहे. गावांना जोडणाऱ्या सर्व्हिस मार्गावर अल्पावधीतच खड्डे पडले आहेत. महाडपासून मुंबईच्या दिशेने लाखपाले, टेमपाले, लोणेरे, तळवली, मुगवली फाटा, पुढे कोलाड पासून थेट वडखळ पर्यंत रस्त्याची दुरवस्था आहे. नागोठणे ते वडखळ पर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे वाहन एखाद्या ग्रामीण रस्त्यावर चालत असल्याचा अनुभव येत आहे. कोलाडजवळ रातवड, धरणाची वाडी, भुवन, पोटणेर, तीसे, वरसगाव, आंबेवाडी नाका, खांब साईनगर, खांब ते सुकेळी खिड, जिंदाल हॉस्पिटल ते वाकण फाटा, वाकण फाटा ते नागोठणे, नागोठणे ते कामत हॉटेल, पुढे नीडी, पळस, पांडापूर, कासू, निगडे, आमटेम या दरम्यान अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, दोन रस्त्यांच्या मधील जोड आणि उंचवटे यामुळे वाहनचालकांना, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सव काळात भरलेले खड्डे गणेशोत्सव झाल्यानंतर पूर्ववत झाले आहेत. जागोजागी बाह्य वळण रस्ते, केलेले खोदकाम, यामुळे हा महामार्ग प्रवास करण्यास धोकादायक बनला आहे.
अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत हा महामार्ग येत असल्याने सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि अभियंता यांचा वरदहस्त या ठेकेदारांना असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. असुरक्षित रस्ते कामांमुळे वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे. प्रतिदिन प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती झाली आहे. खड्डे भरले जात नाहीत, रस्त्यावर डांबर टाकून खड्डे सुस्थितीत भरले जात नाही, बाह्य वळणाच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था नाही, दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अधिकारी मात्र कार्यालयाच्या ए.सी.ची हवा खात हातावर हात ठेवून नागरिकांचे हाल पाहत बसले आहेत.
या महामार्गावरून प्रवास करताना रुग्णवाहिकेतील रुग्ण अथवा खाजगी वाहनातील प्रवासी किंवा एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणारे गोरगरीब जनता या खड्ड्यांमुळे कमालीची हैराण झाली आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे या महामार्गावरून प्रवास करणारे राज्यातील व केंद्रातील मंत्री तसेच खासदार, आमदार यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
काँक्रिटीकरणाच्या कामाची गुणवत्ता आणि दर्जाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या काँक्रीटच्या महामार्गावरून प्रवास करताना पूर्णपणे धुळीचे साम्राज्य पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रदूषणाचा देखील सामना करावा लागत आहे. राज्यकर्ते एसी गाडीतून फिरतात, मात्र सर्वसामान्य जनता महामंडळाच्या गाडीतून फिरत असल्याने या सामान्य प्रवाशांना वालीच उरला नाही, अशी अवस्था मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे.