मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना खुले पत्र
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने हिंदू मतदारसंघ मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून, आज भाजप सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून २५ ऑगस्टला ‘वराह जयंती’ राज्यस्तरावर शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी केली आहे.
राणे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, हिंदू धर्मातील दहा अवतारांपैकी तिसरा अवतार म्हणजे वराह देव, ज्यांनी पाताळातून पृथ्वीचा उद्धार केला. परंपरेत हा अवतार पूजनीय मानला जातो. त्यामुळे राज्य सरकारने २५ ऑगस्टला ‘वराह जयंती उत्सव दिवस’ म्हणून जाहीर करावा, असा त्यांचा आग्रह आहे.
राणे यांनी मांडलेल्या प्रस्तावात असे नमूद आहे की, जर सरकारने मान्यता दिली तर हा पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा ‘वराह जयंती’ शासकीय स्तरावर साजरी केली जाईल. फक्त मंदिरांपुरता उत्सव मर्यादित न राहता, जिल्हा पातळीपासून प्रमुख शहरांपर्यंत भव्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेऱ्या, पूजा-अर्चा, शैक्षणिक स्पर्धा व भक्तांच्या सहभागाचे मोठे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, या निर्णयाने नवे वादळं उठण्याची शक्यता आहे. विरोधकांचा पारा आणखी चढणार का, आणि सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा अधिक धारदार होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
२५ ऑगस्टला महाराष्ट्र एका नव्या ‘राज्यस्तरीय धार्मिक उत्सवा’चा साक्षीदार ठरणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, या उत्सवामागील राजकीय तापमान किती वाढेल, हे पाहणे आता सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.