X : @Rav2Sachin
मुंबई: मागील वर्षी केंद्र शासनाकडून सर जे. जे. कला महाविद्यालयाला (Sir JJ School of Art) अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा बहाल करण्यात होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासंबंधीची मान्यता अद्याप महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम कधी सुरु होणार, यंदा प्रवेश घेता येईल का, फी किती असणार आहे, अभ्यासक्रम कसा असेल, असे विविध सवाल विद्यार्थी आणि पालक वर्गात उपस्थित होत आहे.
मागील वर्षी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केल्याचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केले होते. जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे वर्ष २०२४ पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी कुलगुरु नियुक्ती सोबतच प्राध्यापकांची नियुक्ती आणि फी संबंधीचा आराखडा तसेच अभ्यासक्रम, यासर्व गोष्टींसाठी महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळणे आवश्यक आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु करायचा असल्यास मार्च महिन्यापर्यंत तरी अभिमत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला तरी अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी अद्याप महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता कधी मिळेल, हे आम्हाला माहीत नाही. पण जेव्हा मान्यता मिळेल, तेव्हा अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु होईल, असे कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी सांगितले.