मुंबई
लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसचा जबर धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसमधील युवा चेहरा मिलिंद देवरा आज शिवसेनेत सामील होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून पक्षबांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असताना मिलिंद देवरा यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.
आज दुपारी २ वाजते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह १० माजी नगसेवक, २० पदाधिकारी, १५ महत्त्वपूर्ण व्यापारी संघटना, ४५० कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज १०.३० वाजता ते आपले निवास्थान रामालायम पेडर रोडपासून सिद्धीविनायक मंदिराकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर ११ वाजता सिद्धीविनायकाचं दर्श घेतील. यावेळी आमदार सदा सरवणकर उपस्थित असतील. यानंतर १.३० वाजता वर्षा बंगल्यावर त्यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आगमन होईल आणि २.०० वाजता पक्ष प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यतेचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ते आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण अध्यायाचा शेवट करीत आहेत. सोबतच काँग्रेस पक्षासोबत आपल्या कुटुंबाच्या ५५ वर्षांचं नातं संपवत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी आणि सर्व नेत्यांनी इतक्या वर्षात केलेल्या समर्थनासाठी मी सर्वांचा आभारी आहे.