Twitter : @Rav2Sachin
मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उदरनिर्वाहासाठी देशभरातून लोकं येत असतात. सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबईत एक धक्कादायक घटना रात्री घडली. कांदिवली येथे सिध्दार्थ अंगुरे नावाच्या एका मराठी तरुणाला परप्रांतिय टोळक्यांनी बळजबरीने “जय श्रीराम” च्या घोषणा द्यायला लावल्या. त्याने नकार दिल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत “जय श्रीराम बोल नही तो मारुंगा”, तु कटवा है क्या? असं म्हणत परप्रांतीय टोळीने या तरुणाला जबर मारहाण केली. तरुणाचा भाऊ आणि नातेवाईक मध्ये आल्यामुळे कसाबसा हा तरुण थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे उपचार सुरू आहे.
याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीकडे मदतीसाठी धाव घेतली असता वंचित बहुजन आघाडीकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. संशयित आरोपी सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित, राजेश रिक्षावाला यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 341, 504, 323, 506, 34 अन्वये कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित तरूण सिद्धार्थ अंगुरे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करणे, कट्टर धार्मिक बनवून तणाव निर्माण करणे, अशा घटनांनी देश होरपळून निघत आहे. मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.