मुंबई: लंडनमधील मराठी बांधवांचा अभिमान उंचावणारी आणि दीर्घकाळची स्वप्नपूर्ती ठरणारी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंगळवारी केली. लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची ऐतिहासिक वास्तू खरेदी करून तेथे ‘महाराष्ट्र भवन’ (Maharashtra Bhavan in London) उभारले जाणार असून त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधीही त्यांनी जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे लंडनमधील मराठी बांधवांना आता स्वतःचे कायमस्वरूपी सांस्कृतिक व सामाजिक केंद्र मिळणार आहे. अनेक वर्षे भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या मराठी सांस्कृतिक उपक्रमांना अखेर ‘आपले घर’ मिळणार आहे.
1932 मध्ये डॉ. एन.सी. केळकर यांनी स्थापन केलेल्या या मंडळाने गेली 93 वर्षे लंडनमध्ये मराठी संस्कृतीचा झेंडा उंचावत ठेवला. मात्र स्वतःची इमारत नसल्याने कार्यक्रम नेहमीच तात्पुरत्या जागी घ्यावे लागत होते. लंडन व परिसरातील तब्बल 1 लाख मराठी बांधवांची ही जुनी मागणी महायुती सरकारने अखेर पूर्ण केली आहे.
‘महाराष्ट्र भवन’ हे फक्त एक इमारत न राहता भारत आणि युनायटेड किंगडममधील (UK) सांस्कृतिक पूल ठरणार आहे. येथे मराठी साहित्य, नृत्य, संगीत, सण-उत्सवांचे आयोजन तर होईलच; शिवाय मराठी भाषेच्या जागतिक प्रसारालाही नवा वेग मिळेल. भाषा वर्ग, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदा याही या भवनात आयोजित करता येणार आहेत.
गेल्या आठवड्यात मंडळाच्या प्रतिनिधींनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी मांडली होती. त्यावर पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निर्णय घेतला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची मान्यता मिळाल्यानंतर या ऐतिहासिक निर्णयाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
आता लंडनमध्ये मराठी बांधवांसाठी कायमस्वरूपी ‘महाराष्ट्र भवन’ उभे राहणार असल्याने संपूर्ण मराठी समाजात आनंदाची लाट उसळली आहे.