मुंबई – ओबीसी समाजासाठी आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेसचा चेहरा उघड झाला असून, त्यांचा इतिहासच विश्वासघाताने बरबटलेला आहे, असा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
“आज राहुल गांधी आणि विजय वडेट्टीवार यांसारखे नेते ओबीसींना भडकवण्याचे पाप करत आहेत. मात्र, खरा इतिहास सांगतो की ओबीसींचे नुकसान करणारी काँग्रेसच आहे,” असा थेट घणाघात उपाध्ये यांनी केला.
त्यांनी यावेळी स्व. राजीव गांधींच्या ६ सप्टेंबर १९९० रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचा दाखला दिला. “मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवणारे राजीव गांधीच होते. इतकंच नव्हे तर इंदिरा गांधींच्या काळातही ओबीसींचा प्रश्न दाबून टाकण्यात आला. या सगळ्या विश्वासघाताचे काँग्रेसच जबाबदार आहे,” अशी टीका त्यांनी केली.
उपाध्ये यांनी काँग्रेसच्या भूमिकेची उदाहरणेही मांडली. १९५५ मध्ये स्थापन झालेल्या काका कालेलकर आयोगाचा अहवाल काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळापुढे न आणता थेट कुजवत ठेवला. मंडल आयोगाचा अहवालही धूळ खात पडला. “हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा. त्या काळी शरद पवार काँग्रेसमध्ये असूनही गप्प बसले होते,” असा टोलाही त्यांनी लगावला.
याउलट भाजपाने ओबीसींच्या हितासाठी ठोस पावले उचलली असल्याचा दावा त्यांनी केला. “तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने भाजपाच्या पाठिंब्यानेच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. पुढे मोदी सरकारने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला,” असे उपाध्ये यांनी नमूद केले.