नागपूर
महाराष्ट्र विधानपरिषदेचे 96 वर्षीय सर्वात ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा दिनांक 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधानपरिषदेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 8 नोव्हेंबर, 2023 आणि 8 डिसेंबर, 2023 रोजी अनुक्रमे मुंबई आणि नागपूर येथे जो समारंभ झाला, त्याला वयोमानामुळे माजी विधानपरिषद सदस्य ॲड. गोविंदराव आठवले, उपस्थित राहू शकले नव्हते.
त्यांचे वय 96 वर्ष आहे, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उप सभापतींचे विशेष कार्य अधिकारी संतोष उडतेवार यांनी ॲड. गोविंदराव आठवले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा शाल, गौरवचिन्ह, विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ग्रंथाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी त्यांचे पुतणे अतुल आठवले आणि परिवारजन तसेच ते विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य असतांना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक उपस्थित होते. सन 1972 ते 1978 याकाळात ॲड. गोविंदराव आठवले विदर्भ पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करीत होते. वयाच्या 96 व्या वर्षी देखील ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांची स्मरणशक्ती आणि वाणी तीक्ष्ण असून त्यांनी या सत्कारप्रसंगी 1972 ते 1978 या काळातील विधानपरिषदेतील अनेक महत्वाचे प्रसंग, आठवणींना उजाळा देत सत्काराबद्दल आनंद आणि धन्यवादाची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे चरित्र कृतज्ञतापूर्वक उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना सस्नेह भेट दिले