मुंबई : शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीची मुदत आज (३० सप्टेंबर) संपत असल्याने, तिला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. आता १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सहाय्यक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून खरीप हंगाम २०२५ मधील पीक पाहणीबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज कळविण्यात आले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यामुळे यापूर्वी पीक पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढविण्यात आला होता. तो कालावधी ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपत असल्याने आता आणखी एक महिना वाढविण्यात आला आहे.
या मुदतीत प्रत्येक गावातील शिल्लक राहिलेल्या शेतांची पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पूर्ण करायची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दैनंदिन पाहणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
सहाय्यकांनी केलेल्या प्रत्येक पीक पाहणीची १०० टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद ७/१२ उताऱ्यावर प्रसिद्ध होते.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, बहुतांश वेळा गावांपासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी प्रलंबित राहते. अशा परिस्थितीत सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. १०० टक्के पीक पाहणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.