X : @therajkaran
सांगली/मुंबई
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची वारसास्थळे, गड किल्ले यावरचे अतिक्रमण निश्चित हटवले जाईल आणि हिंदवी स्वराज्याच्या वारसास्थळांवर केवळ भगवाच फडकलेला दिसेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच सांगली येथे केले.
ना. सुधीर मुनगंटीवार सांगली दौऱ्यावर आले असता, प्रतापगडाच्या पायथ्याचे अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण हटविल्याबद्दल श्रीशिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने त्यांचा चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेश खाडे आणि श्रीशिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, औरंगजेब आणि अफजलखानासारखे परके आक्रमक आणि क्रूर अत्याचारी आमचे आदर्श कधीही होऊ शकत नाहीत. त्या क्रूर असुरांशी लढून हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षणाकरता प्राणार्पण करणारे महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई हेच आमचे आदर्श आहेत. स्वराज्यशत्रूंचे उदात्तीकरण या देशात कधीही खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची वारसास्थळे लवकरच अतिक्रमणमुक्त केली जातील आणि त्यावर भगवाच फडकलेला दिसेल, असे ते म्हणाले. माजी आमदार नितीन शिंदे यांनी प्रतापगड पायथ्याशी अफजलखानाचे जे उदात्तीकरण चालले होते, त्याविरोधात सातत्याने संघर्ष केला. मात्र मतपेटीचे लांगुलचालन करणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
सांगलीतील प्रवीण कवठेकर यांनी अफजलखान वधाचे पोस्टर काढले होते, त्यांना तत्कालीन कॉन्ग्रेस सरकारने तुरुंगात टाकले होते, त्याची आठवण सांगत ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी त्यांच्या अटकेविरोधात तेव्हा आवाज उठवला होता.
काहींच्या मेंदूत शिरलेला अफजलखानाचा व्हायरस काढण्यासाठी वाघनखे परत आणणार : सुधीर मुनगंटीवार
प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यशत्रू अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण तर हटवले आहे. मात्र काहींच्या मेंदूत अफजलखानाचा व्हायरस शिरला आहे. तो काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे ब्रिटनहून परत आणणार आहे, असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.