नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सन 2023 मधील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री चैत्राम पवार होते, तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, प्रा. संजिवनी महाले आणि विद्यार्थी कल्याण केंद्र प्रमुख डॉ. दयाराम पवार यांची उपस्थिती होती.
सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण आणि बाबुराव बागुल यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून झाली.
प्रमुख पुरस्कार विजेते
• बाबुराव बागुल कथा पुरस्कार – विवेक वसंत कडू (कथासंग्रह चार चपटे मासे)
• रुक्मिणी पुरस्कार – दीपा अरुणा अशोक पवार (भटक्या-विमुक्त समाजासाठी कार्य)
• शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार – डॉ. तक्षशिला मोटघरे (शैक्षणिक आणि सामाजिक योगदान)
• ज्ञानदीप पुरस्कार – डॉ. संजय भीमाशंकर रत्नपारखी (दूरशिक्षण आणि मुक्त शिक्षण क्षेत्रातील योगदान)
पुरस्कारार्थींनी आपले विचार व्यक्त करताना समाजासाठी काम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. पद्मश्री चैत्राम पवार म्हणाले, “पुरस्कार मिळाल्यावर थांबायचे नाही, तर समाजासाठी नवे नेतृत्व घडवणे हे ध्येय ठेवावे.”
कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी मुक्त विद्यापीठाचे लोकाभिमुख कार्य अधोरेखित केले. “समाजात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करणे हेच या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. पूनम वाघ यांनी केले.