मुंबई : सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेल्या अंधेरी विकास समिती या संस्थेच्या वतीने आज अंधेरी (पूर्व) येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल खाजगी उद्योगपतीला विकण्याच्या प्रस्तावाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व कार्याध्यक्ष दिलीप माने आणि अध्यक्ष, माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केले.
मोर्चाला संबोधित करताना दिलीप माने म्हणाले, “अंधेरी (पूर्व) – मरोळ परिसर हा प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गीय लोकवस्तीचा भाग आहे. मुंबई महानगरपालिकेने २०१० मध्ये स्थापन केलेले सेव्हन हिल्स हॉस्पिटल या भागातील हजारो गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. हे रुग्णालय सध्या आंध्र प्रदेशातील एका खाजगी उद्योगपतीकडे आहे; मात्र तो व्यवसायातील नुकसानीमुळे दिवाळखोरीत गेला असून हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत हे रुग्णालय मुंबईतील एका उद्योगपतीला विकले जाणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर अंधेरीतील जनतेत प्रचंड संताप आहे.”
सेव्हन हिल्स हे आशियातील मोठ्या हॉस्पिटलपैकी एक असून, त्यात १५०० खाटा, ३६ ऑपरेशन थिएटर, १२० आयसीयू, तसेच स्टाफ क्वार्टर्ससह सुमारे १७ एकरांवर अत्याधुनिक सुविधा आहेत. हे रुग्णालय खाजगी उद्योगपतीकडे गेल्यास ते पंचतारांकित रुग्णालयात रूपांतरित होईल आणि सर्वसामान्यांना उपचार घेणे तर दूरच, प्रवेशसुद्धा मिळणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मोर्चा काढण्यापूर्वी समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच पालकमंत्री आशिष शेलार, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, स्थानिक खासदार रवींद्र वायकर, आणि आमदार मुर्जीकाका पटेल यांना सविस्तर निवेदन सादर केले असल्याची माहिती दिली.
स्थानिक आमदार मुर्जीकाका पटेल स्वतः मोर्चात उपस्थित राहिले. त्यांनी सांगितले,
“मी या मागणीशी पूर्ण सहमत आहे. हा मुद्दा मी विधानभवनातही उपस्थित केला आहे. स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर ठेवून मी हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत समितीच्या प्रतिनिधींची बैठक दोन-तीन दिवसांत आयोजित करणार आहे.”
समिती अध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले, “सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी उद्योगपतीला दिल्यास त्याची किंमत जास्तीत जास्त ₹३००-₹४०० कोटी एवढीच ठरेल. मात्र, ₹७०,००० कोटींचे बजेट आणि ₹८०,००० कोटींच्या मुदत ठेवी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला हे रुग्णालय स्वतः चालवणे अजिबात अवघड नाही. दरमहा सुमारे ₹५० कोटी खर्च अपेक्षित असून तो जीएसटी व अन्य महसूलातून सहज भागवता येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जे.जे., के.ई.एम. आणि सायन हॉस्पिटलच्या धर्तीवर हे हॉस्पिटल महानगरपालिकेतर्फे चालवावे, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात वैद्यकीय व नर्सिंग शिक्षण घेता येईल.”
समितीचे पदाधिकारी दिनकर तावडे, प्रमोद सावंत, क्लाईव्ह डायस, आणि अखिलेश सिंग यांनी कोविड काळात सेव्हन हिल्स हॉस्पिटल ने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करत, “असे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेनेच चालवावे,” अशी मागणी केली.
मोर्चात उपाध्यक्ष दिनकर तावडे, शांताराम पाटकर, अखिलेश सिंग, सरचिटणीस क्लाईव्ह डायस, माजी नगरसेवक प्रमोद सावंत, सचिव शिवनाथ खैरनार, जगत गौतम, पृथ्वी मस्के, शैलेंद्र कांबळे, ब्रिजलाल तिवारी, हरीश जोगदंड, गोविंद संबुतवाड आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मोर्चाचा समारोप करताना शांताराम पाटकर म्हणाले, “हा विषय शेवटपर्यंत नेण्यासाठी स्थानिक नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे,” असे सांगत मोर्चाचा समारोप करण्यात आला.

