मुंबई – राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने विरोध दर्शवला आहे. “दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे हे लहान मुलांवरचे अतिरिक्त दडपण आहे. सरकारने लादलेली तिसऱ्या भाषेची सक्ती योग्य नाही,” असे मत समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केले.
या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत मराठी भाषेसाठी आयोजित मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण पहिलीपासून तिची सक्ती योग्य नाही. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मराठी व इंग्रजी या दोन भाषाच सक्तीच्या आहेत. जर सरकारला हिंदीचा पर्याय द्यायचा असेल, तर तो इयत्ता पाचवीपासून विचारात घ्यावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
रईस शेख पुढे म्हणाले, “तिसरी भाषा सक्तीने लादण्याचा हा संघ व भाजपचा लपलेला अजेंडा आहे. विरोधी पक्षांनीही या निर्णयाला विरोध केला आहे, त्यास आमचा पाठिंबा आहे.”