बदलापूर: कुळगाव-बदलापूर नगरपरिषद, बदलापूर शहर पत्रकार संघ व कुळगाव-बदलापूर इंजिनिअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित या महोत्सवात एक लाखाहून अधिक पुस्तके उपलब्ध असून, विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी खुला करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ. आशिष दामले, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, शरद तेली, श्रीधर पाटील, संगीता चेंदवणकर, मिलिंद धारवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचनसंस्कृतीला नवे बळ
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी पुस्तके वाचावीत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच छताखाली विविध विषयांवरील लाखो पुस्तके उपलब्ध असल्याने वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तके शोधणे आणि खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे.
यावेळी आमदार किसन कथोरे यांनी “डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असून, पुस्तके म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. अशा प्रकारच्या महोत्सवामुळे वाचनसंस्कृती अधिक बळकट होईल,” असे मत व्यक्त केले.
माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी “बदलापूरकरांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी,” असे आवाहन केले.
वाचकांसाठी पर्वणी
या पुस्तक महोत्सवात साहित्य, विज्ञान, इतिहास, राजकारण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धार्मिक ग्रंथ, बालसाहित्य, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके यांसह अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. बदलापूर आणि परिसरातील नागरिकांनी या पुस्तक महोत्सवाला नक्की भेट द्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.