पुणे : देशभरात पाकिस्तानविरोधी संताप असताना मोदी सरकार मात्र पाकिस्तानी क्रिकेटसमोर गुडघे टेकते आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने आज पुण्यात केला. येत्या १४ सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत–पाक सामना रद्द करण्याची मागणी करत शिवाजीनगर मेट्रो चौकात संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटचा टी-शर्ट जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वी जम्मू–काश्मीरमधील पहलगाम घाटी दहशतीने थरारली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप भारतीयांचा बळी घेतला. त्या शोकाकुल आठवणी अजूनही ताज्या असताना मोदी सरकार मात्र त्या दहशतवादी देशासोबत ‘एशिया कप’मध्ये खेळायला तयार होते, ही थेट शहिदांचा आणि देशभक्तीचा विटंबना असल्याचे आम आदमी पक्षाने स्पष्ट केले.
“ज्या दहशतवादी राष्ट्राने पहलगाममध्ये भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले, त्या देशासोबत क्रिकेट खेळण्यामागे मोदी सरकारची कोणती मजबुरी आहे? काही ठराविक कॉर्पोरेट हितसंबंध जपण्यासाठी देशप्रेमाला तिलांजली देणारे हे सरकार आम्ही कधीही मान्य करणार नाही. हा सामना म्हणजे थेट देशद्रोह आहे. आम्ही सर्व देशभक्त नागरिकांना आवाहन करतो की या लाजिरवाण्या सामन्याचा तीव्र निषेध करा, बहिष्कार घाला,” असा इशारा आम आदमी पक्षाने दिला.
या संतप्त आंदोलनात पक्षाचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले, अनिकेत शिंदे, सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
“शहिदांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार मोदी सरकार लाजलं पाहिजे,” अशा घोषणांनी शिवाजीनगर मेट्रो चौक आज दणाणून गेला.