Twitter : @NalavadeAnant
मुंबई
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Kranti Jyoti Savitribai Phule) या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक (National Memorial of Savitribai Phule at Bhide Wada) उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐन नवरात्रोत्सवातच न्यायालयाने हा निकाल दिल्याने महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार आहे. भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला (movement for women empowerment) प्रेरणा, प्रोत्साहन, बळ देईल, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली.
अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात (Bhide Wada, Pune) देशातील पहिली मुलींची शाळा (First school for girl students) सुरु करुन महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे देशाला महिला शिक्षणाचा विचार व दिशा मिळाली. ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक (National memorial) उभारण्याची राज्य सरकारची अनेक वर्षापासूनची योजना होती. त्या जागेबाबत तेथील पोटभाडेकरुने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. गेल्या अनेक वर्षापासून या न्यायालयीन लढ्यात अनेक जण सक्रीय सहभागी होते, या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठीच्या लढ्याचा मी देखील साक्षीदार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) पोटभाडेकरुची याचीका फेटाळून ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे भिडे वाड्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी फुले दाम्पत्याच्या कार्याला साजेसे भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य सरकारच्यावतीने उभारले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.